
कायदेविषयक जनजागृती, सायबर सुरक्षा, छेडछाड व लैंगिक अत्याचार रोखण्यासह ‘ड्रग फ्री कॅम्पस’वर चर्चा; प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर पोलिसांचा भर
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : माओवादासह विविध आव्हानांचा सामना करत असतानाच गडचिरोली पोलीस दलाकडून महिला सुरक्षा व सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, कायदेविषयक माहिती आणि आवश्यक सुविधा पोहोचविण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत.

याच अनुषंगाने महिला सक्षमीकरण, सुरक्षितता आणि महिलांना शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने दि. २१ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
महिलांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या या समितीत अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक (गृह), पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह गडचिरोली शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्या, प्रतिष्ठित महिला, महिला वकील, डॉक्टर आणि शिक्षिका यांचा समावेश आहे.
बैठकीत महिलांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, महिलांची सुरक्षितता, कायदेशीर हक्क, सामाजिक प्रश्न तसेच शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी संबंधित विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांना छेडछाड, लैंगिक अत्याचार व इतर गुन्ह्यांपासून संरक्षण मिळावे, यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती देण्यात आली.
यासोबतच सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्क साधण्याची पद्धत याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून उपलब्ध असलेल्या मदत यंत्रणांची माहितीही देण्यात आली.
बैठकीदरम्यान ‘ड्रग फ्री कॅम्पस’ या संकल्पनेवरही विशेष चर्चा करण्यात आली. शैक्षणिक संस्थांमध्ये अमली पदार्थांचा वाढता धोका रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आणि विविध घटकांच्या सहभागातून नशामुक्त वातावरण निर्माण करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
विशेष म्हणजे, बैठकीस उपस्थित महिला दक्षता समितीच्या सदस्यांकडूनही महिला सुरक्षा, सामाजिक प्रश्न, कायदेविषयक जनजागृती आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत विविध सल्ले व सूचना घेण्यात आल्या. महिलांच्या समस्या अधिक प्रभावीपणे समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी अशा बैठका महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
‘घटना घडल्यानंतर कारवाईपेक्षा घटना घडू नये यावर भर’ — पोलीस अधीक्षक एम. रमेश
बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सांगितले की, एखादी घटना घडल्यानंतर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यापेक्षा अशी घटना घडूच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर गडचिरोली पोलीस दलाचा विशेष भर राहणार आहे.
महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला किंवा अत्याचाराला बळी न पडता आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. महिलांना त्यांच्या समस्या मोकळेपणाने मांडता याव्यात तसेच अडचणीच्या प्रसंगी पोलीस दलाकडून तात्काळ मदत मिळावी, यासाठी पोलीस दल सदैव तत्पर आहे. डायल ११२ या आपत्कालीन संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून महिला व बालकांसह सर्व नागरिकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यासाठी जागरूक राहून सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वावलंबन यांना प्राधान्य देत गडचिरोली पोलीस दल महिला सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले.
महिला दक्षता समितीच्या उपक्रमाचे स्वागत
महिला सुरक्षेसाठी पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे उपस्थित महिला सदस्यांनी स्वागत केले. महिलांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी, त्यांना कायदेशीर मार्गदर्शन देण्यासाठी आणि अडचणीच्या प्रसंगी तातडीने मदत मिळवून देण्यासाठी अशा प्रकारच्या बैठका नियमितपणे आयोजित करण्यात याव्यात, अशी अपेक्षाही उपस्थितांनी व्यक्त केली.
आयोजनासाठी विशेष परिश्रम
सदर बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो .नि. अरुण फेगडे, भरोसा सेलच्या मपोउपनि. राजश्री रामटेके तसेच संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले. महिला सुरक्षा, जनजागृती आणि सक्षमीकरणाच्या दिशेने गडचिरोली पोलीस दलाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

