
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
गडचिरोली, दि. १५ जूलै : यंदाच्या खरीप हंगामात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची किंवा दीर्घ खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर धानासह इतर खरीप पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तातडीने सहभागी होऊन पिकांचे विमा संरक्षण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, एल निनोमुळे हवामानातील अनिश्चितता वाढून दुष्काळ, अतिवृष्टी, पावसातील मोठा खंड यांसारख्या नैसर्गिक संकटांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा आणि पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाची प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची ठरत आहे.

या योजनेंतर्गत पावसातील खंड, पूर, दुष्काळ, भूस्खलन, वीज कोसळणे, तसेच कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी निर्धारित निकषांनुसार नुकसानभरपाई दिली जाते. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी प्रभावी आर्थिक सुरक्षा कवच असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतकरी आपल्या पिकाचा विमा सामाईक सेवा केंद्र (CSC), संबंधित बँक शाखा, अधिकृत PMFBY पोर्टल किंवा Crop Insurance App द्वारे सहज भरू शकतात. त्यामुळे शेवटच्या क्षणाची गर्दी टाळून पात्र शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने सांगितले आहे.

