
न्यूज जागर प्रतिनिधी
गडचिरोली,दि.३० जून:
जिल्हाभरात शाळांच्या पहिल्या दिवसाचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, गडचिरोली तालुक्यातील हिरापूर येथे मात्र संतापजनक चित्र पाहायला मिळाले. विमानतळासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणाला विरोध दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेवरच बहिष्कार टाकला. दप्तर आणि गणवेशात शाळेत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी वर्गात न जाता प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने प्रवेशोत्सवासाठी बँडवाजा, रांगोळी आणि फुलांची विशेष सजावट केली होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या या बहिष्काराने सर्व नियोजन फोल ठरले. शालेय घंटा न वाजल्याने प्रवेशोत्सवाचे वातावरण मावळले. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या कार्यकारी अभियंत्यांनाही विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे कोणताही कार्यक्रम न करताच माघारी परतावे लागले.
हिरापूरसह गुरवळा, राखी आणि शिरपूर या गावांतील जमीन विमानतळासाठी अधिग्रहित करण्यात येणार आहे. ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी १२ मे २०२६ च्या प्रक्रियेवर पुढील कारवाई न करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र, अलीकडेच विमानतळ प्रकल्पासाठी वनजमिनीच्या महसुलीकरणासाठी सल्लागार नियुक्तीची निविदा काढण्यात आल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला आहे. २ जुलै रोजी ही निविदा उघडणार असल्याने, शासन पडद्यामागून जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपसरपंच दिवाकर निसार यांनी केला आहे. पालकांनीही या आंदोलनाला उघड पाठिंबा दिल्याने जमीन अधिग्रहणाचा हा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

