
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी
१०८ रुग्णवाहिकेला विलंब; पिकअपमधून रुग्णालयात हलवले, उपचारादरम्यान मृत्यू
कोरची, दि. — भंडाऱ्यावरून कोरचीकडे येत असलेल्या दुचाकीचा मसेलीजवळील तीव्र वळणावर भीषण अपघात होऊन चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सोबत प्रवास करणारा एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश करेमोरे (वय ४५, रा. भंडारा) हे दुचाकीने कोरचीकडे येत होते. मसेलीजवळील धोकादायक वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन प्रथम डिव्हायडरवर आदळले आणि त्यानंतर झाडावर जाऊन जोरदार धडकले. या अपघातात करेमोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिका पोहोचण्यास सुमारे दोन तासांचा विलंब होणार असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिकांनी पुढाकार घेतला. मसेली येथील वाहनचालक संजू मसराम यांनी पिकअप वाहनाची व्यवस्था केली. युवा कार्यकर्ते प्रशांत कराडे यांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित बुद्धे यांनी उपचार सुरू केले; मात्र गंभीर जखमी अवस्थेमुळे नितेश करेमोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रामविलास लोधी (वय ३०, रा. मध्य प्रदेश) हे गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला व खांद्याला मार लागला आहे. त्यांच्यावर कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतक नितेश करेमोरे हे ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधित असून त्यांच्या मालकीचे दोन ते तीन ट्रक असल्याची माहिती आहे. मिनी बाजारांसाठी विविध ठिकाणी मालवाहतूक करण्याचे काम ते करत होते. कोरची येथे सुरू असलेल्या मिनी बाजाराशी संबंधित कार्यक्रमासाठी ते भंडाऱ्यावरून कोरचीकडे येत होते. मात्र, कोरचीपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मसेलीजवळच काळाने त्यांना गाठले.
या प्रकरणाचा पुढील तपास कोरची पोलीस करीत आहेत.

