
काटोल प्रतिनिधी , न्युज जागर
काटोल :- रविवारी दुपारी एकीकडे सूर्य आग ओकत असताना तिकडे काटोल-नागपूर रस्त्यावर अपघातग्रस्त आई व मुलगा जखमी अवस्थेत मदतीसाठी याचना करत होते, मात्र कुणीही मदतीसाठी थांबले नाही. तेवढ्यात नागपूर शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले तेथे आले व आपल्या वाहनातून स्वतः जखमींना रुग्णालयात घेऊन गेले. या कृतीतून आमदारांनी लोकप्रतिनिधींची लोकसेवेची परंपरा चालू ठेवत माणुसकी अजूनही जीवंत असल्याचेच पुन्हा एकदा सिद्ध केले.
झाले असे की, काटोल येथील बनारसीदास रुईया हायस्कूल तसेच विदर्भ माध्यमिक संघाचे जिल्हा सदस्य प्रशांत पिंपळकर सर यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम तिरुपती मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हे आपल्या सहकाऱ्यांसह नागपूरला जात होते. तेवढ्यात काटोल जवळच आमदार अडबाले यांना एक अपघातग्रास्त दुचाकी रस्त्याच्या कडेला पडून दिसली व बाजूलाच जखमी अवस्थेत दुःखाने विव्हळणारे आई आणी मुलगा मदती साठी याचना करत होते, पण कोणीही थांबायला तयार नव्हते.


आमदार अडबाले यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ आपल्या वाहकाला वाहन थांबवायला लावले व आपल्या सहकाऱ्यांना वाहनातून खाली उतरवून जखमी कुणाल लनंतनजी मोहरिया ( वय 24 वर्ष) व वनिता मोहरिया (वय 45 वर्ष ) यांना आपल्या वाहनातून काटोल येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले व भरती करून घेतले. ही बाब समजताच पेठबुधवर येथील नगरसेवक सुरेंद्र लोही, धीरज ढोले, विजय चौधरी, धनराज राउत सर आदी लगेच दवाखान्यात पोहचले व जखमींची विचारपूस केली.
जखमींना डॉ राजेंद्र खोब्रागडे यांनी प्राथमिक उपचार करून सिटी स्कँन करीता नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याने त्यांची तशी व्यवस्था लावून शिक्षक आमदार अडबाले पुढे नागपूरला रवाना झाले.
#newsjagar #MLA SUDHAKAR ADBALE #काटोल न्यूज

