
प्रतिनिधी / रुपेश सलामे
गडचिरोली: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरती प्रक्रियेतून निवड झालेल्या पेसा (PESA) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी (पुरुष) आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची भेट घेऊन स्वतःला शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची आग्रही मागणी केली. यावर आमदार महोदयांनी तात्काळ दखल घेत नागपूरच्या आरोग्य उपसंचालकांशी थेट फोनवर संपर्क साधला आणि या कर्मचाऱ्यांना लवकरच शासन सेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या ४ महिन्यांपासून मानधन रखडले

आरोग्य विभागात सेवा देत असूनही गेल्या चार महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले असून, हक्काच्या वेतनासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी त्यांनी लोकप्रतिनिधींचे दरवाजे ठोठावले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भरतीची सुरुवात: १६ मे २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, अंतिम गुणवत्तेच्या आधारे या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड झाली होती.
मानधनावर नियुक्ती: सदर भरती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे, सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार *१० फेब्रुवारी २०२५* रोजी *’विशेष बाब’* म्हणून या उमेदवारांना मानधन तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: या प्रकरणी २ डिसेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम निर्णय दिला. त्यानुसार सदर भरतीमधील ५०% जागा राखीव ठेवून उमेदवारांना तातडीने कायमस्वरूपी करण्याचे आदेश राज्य शासनाला देण्यात आले.
शासन निर्णय (GR) जारी: न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने *११ फेब्रुवारी २०२६* रोजी शासन निर्णय निर्गमित करून ही भरती प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत.
आमदारांना साकडे आणि आश्वासन
शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करूनही अद्याप कायमस्वरूपी नियुक्ती न मिळाल्याने पेसा आरोग्य सेवकांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन दिले. “शासन निर्णयाच्या अधीन राहून आमची मानधन तत्त्वावरील नियुक्ती लवकरात लवकर कायमस्वरूपी करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
आमदार नरोटे यांनी युवकांच्या या समस्येचे गांभीर्य ओळखून थेट नागपूर आरोग्य उपसंचालकांना फोन लावला व प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. आमदारांच्या या सकारात्मक पवित्र्यामुळे लवकरच न्याय मिळेल, अशी आशा उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
निवेदन देणारे प्रतिनिधी श्री. मयुर विनायक कोडापे, श्री. निखिल काशीनाथ उसेंडी, श्री. लोकेशकुमार बस्तर मडावी, श्री. सुजितकुमार शंभु आतला, श्री. लंकेश तुलशीराम तुलावी आणि सर्व पेसा आरोग्य सेवक (पु). हे उपस्थित होते.

