Educated unemployed engineers protest against the administration in Gadchiroli

काळी फीत लावून निषेध; काम वाटपात अन्याय होत असल्याचा आरोप
गडचिरोली, दि. ६ मे —
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा तीव्र स्वरूप धारण केले असून काम वाटप समितीच्या बैठकीत अभियंत्यांनी काळी फीत लावून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदविला. अन्यायकारक काम वाटप, अपुरी संधी आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला कोटा या पार्श्वभूमीवर सुशिक्षित बेरोजगारअभियंत्यांचा रोष उफाळून आला. #newsjagar

Educated unemployed engineers protest against the administration in Gadchiroli
महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आयोजित या बैठकीत शेकडो सुशिक्षित बेरोजगार अभियंते उपस्थित होते. मात्र, बांधकाम विभागाकडून केवळ पाचच कामांचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये तीव्र नाराजी पसरली. “हजारो कामे होत असताना आमच्या वाट्याला मोजकीच कामे का?” असा सवाल यावेळी संतप्त सुशिक्षित बेरोजगारअभियंत्यांनी उपस्थित केला.
मागील दोन-तीन वर्षांपासून काम वाटप समितीच्या बैठका नियमितपणे होत नसून वर्षातून फक्त दोन ते तीन वेळाच घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यातही मिळणाऱ्या कामांचा दर्जा व आर्थिक मर्यादा अत्यंत कमी असल्याने सुशिक्षित अभियंत्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
शासनाने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी ठरविलेला कोटा अद्याप पूर्ण न झाल्याची बाबही यावेळी ठळकपणे मांडण्यात आली. गेल्या दहा वर्षांपासून अनेक अभियंते कामाच्या प्रतीक्षेत असून त्यांना कोणतीही संधी मिळालेली नाही, अशीही तक्रार समोर आली. वाढती बेरोजगारी आणि हाताला काम नसल्यामुळे अनेक अभियंते आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
यावेळी सुशिक्षित बेरोजगारअभियंत्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. “न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही,” असा इशाराही देण्यात आला. दर महिन्याला नियमित बैठका घेऊन जास्तीत जास्त कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्यात यावीत आणि त्यांचा हक्काचा कोटा तातडीने पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, संबंधित विभागाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अन्यथा आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अभियंत्यांकडून देण्यात आला आहे.

