
शेकडो आदिवासी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित; जिल्हास्तरीय बैठकीत संघटन मजबुतीचा निर्धार
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.२६ एप्रिल :–
गडचिरोली येथे भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आदिवासी जनसंवाद यात्रेनिमित्त भाजपा आदिवासी मोर्चाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या बैठकीस आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, माजी खासदार तथा राष्ट्रीय अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार कृष्णाजी गजबे, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, आदिवासी मोर्चा प्रभारी प्रकाश गेडाम, चंदा कोडवते, लोमेश कुळमेथे, ओमकार मडावी, रेवनाथ कुसराम, नंप सभापती हर्षल गेडाम, नगरसेविका वर्षा शेडमाके, माजी जिप सभापती रंजना कोडापे, प्रशांत मडावी, विनय मडावी हे प्रमुख उपस्थित होते. बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची भाजपा आदिवासी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच आदिवासी मोर्चाची जिल्हास्तरीय बैठक घेतल्याने त्यांचे भव्य आणि जल्लोषपूर्णस्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. आदिवासी समाजाला भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीशी जोडून त्यांच्या समस्या जाणून घेणे, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, तसेच समाजातील युवक, महिला आणि शेतकरी वर्गाला संघटनात सहभागी करून घेण्यावर त्यांनी भर दिला.
यावेळी त्यांनी आदिवासी समाजाला एकजूट करण्यासाठी भाजपा आदिवासी मोर्चा तर्फे एक पंचसूत्री कार्यक्रम तयार करण्यात आल्याची माहिती दिली. या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य आणि स्वजागृती या विषयांवर प्रभावीपणे काम करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाने या पाच सूत्रांचा स्वीकार केल्यास आदिवासी समाज अधिक संघटित, सक्षम आणि एकसंघ राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून कार्यकर्त्यांनी सरकारच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. जनतेच्या अडचणी सोडवून पक्षाबद्दल विश्वास निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची माहिती दिली. शिक्षण, आरोग्य, रोजगार, वनहक्क आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून समाज उन्नतीसाठी शासन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
या आदिवासी जनसंवाद बैठकीमुळे गडचिरोली जिल्ह्यात भाजपा आदिवासी मोर्चाला नवचैतन्य मिळाले असून आगामी काळात संघटन विस्तारासाठी मोठी ताकद निर्माण होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

