
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची
कोरची तालुक्यातील कोटगुल येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सत्र २०२५-२०२६ मधील धान खरेदी न केल्यामुळे शेतकरी सध्या कर्जबाजारी झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या अन्यायाविरुद्ध संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन १ मे पासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या आणि समस्या:
कर्ज आणि व्याजाचा प्रश्न: धान खरेदी न झाल्यामुळे शेतकरी बँकेचे कर्ज फेडू शकत नाहीत. जोपर्यंत धान खरेदी होऊन चुकारे (पेमेंट) मिळत नाहीत, तोपर्यंत कर्जाचे व्याज आकारले जाऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दोषींवर कारवाईची मागणीकोटगुल केंद्राच्या संचालकाची तात्काळ चौकशी करण्यात यावी. जर केंद्र संचालक शेतकऱ्यांना वेठीस धरून आत्महत्येस प्रवृत्त करत असेल, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
केंद्र बरखास्तीचा इशारा:जर केंद्र संचालक मंडळावर नियंत्रण नसेल आणि संचालक मनमानी कारभार करत असतील, तर सध्याचे मंडळ बरखास्त करून नवीन कार्यकारणी गठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनाचा टप्पा: शासन आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. आंदोलनाचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:
१ व २ मे २०२६ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
३ व ४ मे २०२६ साखळी उपोषण.
५ मे २०२६ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, कर्जबाजारीपणामुळे एखाद्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी केंद्र संचालक आणि प्रशासनाची राहील. या निवेदनाच्या प्रती कोरची आणि कोटगुल पोलीस स्टेशनला देखील माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.

