Manoj Dhore

देसाईगंज
अतिदुर्गम, अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहर प्रगत शहर म्हणून प्रख्यात आहे.येथील प्रसिद्ध कपडा बाजार व इतर छोट्या मोठ्या व्यवसायामुळे परिसरातील लोकांना रोजगार उपलब्ध होत असून सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने दुबार तिबार पिके घेतली जातात.मात्र या भागात जेएसडब्ल्यु प्लँटसाठी सुपिक जमिन अधिग्रहित करण्यात येणार असल्याचे सुतोवाच करण्यात येताच येथील शेतकरी धास्तावले आहेत.ही गंभीर बाब लक्षात घेता मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी या भागात जेएसडब्ल्यु प्लँट होणार नसल्याचे जाहीर करावे अन्यथा विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातुन दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील कोनसरी येथे लाॅयड मेटल कंपनीतर्फे आयोजित कार्यक्रमाकरीता आले असता त्यांनी देसाईगंज तालुक्यात जेएसडब्ल्यु प्लँट होऊ देणार नसल्याचे सुतोवाच केले असल्याचे सांगीतले जात आहे.मात्र हे अधिकृत रीत्या जाहीर करण्यात आले नसल्याने येथील शेतकऱ्यांत तीव्र असंतोष खदखदत आहे.देसाईगंज तालुक्यात इटियाडोह सिंचन प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय झाली असल्याने येथील शेतकरी धान पिकासह भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड करून दुबार,तिबार पिक घेऊन आर्थिक उन्नतीकडे वाटचाल करू लागले आहेत.

लगतच देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठ उपलब्ध असल्याने येथील शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यास सोईचे होते.मात्र हातची सिंचन सुविधायुक्त सुपिक जमिन निघून गेल्यास येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्यावाचून राहणार नसल्याचे उघड सत्य आहे. देसाईगंज तालुक्यात शेती करणारा हा बहुतांशी कुणबी समाज असुन समाजात अशिक्षितपणा जास्त असल्याने या समाजाला शेती करण्यावाचून पर्याय नाही. शिक्षणा अभावी बहुसंख्य कुणबी समाज जेएसडब्ल्यु प्लँटला जागा देण्यात आल्यास रस्त्यावर येऊन बरबाद होईल.
जमीनीचा कितीही मोबदला देण्यात आला तरी त्याच पैशात सुपिक जमिन मिळणार नसल्याने रोजगाराअभावी या समाजावर उपासमारीची वेळ येईल.तसेच प्लँटच्या प्रदुषणामुळे देसाईगंज शहर प्रभावित झाल्यास येथील उद्योगधंदे बंद पडून मिळत असलेला रोजगार तो देखील बंद होईल. सिंचनयुक्त दुसरी जागा मिळणार नसल्याने तसेच हातचा रोजगारही हिरावल्या गेल्यास येथील नागरीक आपोआप बरबादिच्या खाईत ढकलल्या जातील.ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत जेएसडब्ल्यु प्लँट होणार नाही असे अधिकृतरित्या जाहीर करावे, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याला गावात शिरू न देता गावबंदी करून तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा ढोरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातुन दिला आहे.याबाबत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे येथील नागरीकांचे लक्ष लागून आहे.

