
नितेश गट्टीवार गडचिरोली, दि. २० मार्च:
खरीप हंगाम 2025 मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांची धान खरेदी तात्काळ करण्यात यावी, या मागणीसाठी माजी आमदार तथा भाजप आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये 15 हजारांहून अधिक शेतकऱ्यांची अद्याप ई-पीक नोंदणी झालेली नाही. विशेषतः मूलचेरा तालुक्यातील 2039 शेतकरी ई-पीक नोंदणीपासून वंचित राहिल्याने त्यांना आपले धान्य विक्री करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

ई-पीक नोंदणीअभावी शासनाच्या खरेदी प्रक्रियेत सहभागी होता येत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेक शेतकरी धान विक्रीसाठी प्रतीक्षेत असून, त्यांचे मोठे नुकसान होत असल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन तात्काळ ई-पीक नोंदणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, तसेच नोंदणीअभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. होळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार डॉ. होळी यांच्या सोबत मुलचेरा भाजपा तालुका अध्यक्ष संजीव सरकार, रजत मंडल, दिपक मंडल, विकास घरामी, सुभाष कीर्त्यूनिया, ज्योतिष ढाली, विवेक मिस्त्री, धर्मा आत्राम, हिरामोहन डियुतीवार, धर्मा हिचामी, प्रमय हिवरकर, देवदास राय, दानू हिचामी व अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

