
मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पुन्हा घेतली भेट
मुंबई : जिल्ह्यातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या मूलभूत व प्रलंबित प्रश्नांबाबत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असून, त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुलजी नार्वेकर यांची पुन्हा एकदा भेट घेतली. यापूर्वी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान डॉ. होळी यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून अधिकृत निवेदन सादर केले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने आजची ही महत्त्वाची भेट घेण्यात आली.
या भेटीदरम्यान जिल्ह्यातील रडखडालेले व अत्यंत दयनीय अवस्थेत असलेले रस्ते, अपुऱ्या सिंचन सुविधा, शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्याचा प्रश्न, जात पडताळणी समितीचे जिल्ह्याबाहेर स्थलांतर न करता ती जिल्ह्यातच कायम ठेवण्याची मागणी, तसेच शिक्षण क्षेत्रातील गंभीर स्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ. देवराव होळी यांनी जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याकडे लक्ष वेधले. शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेली पोकळी तातडीने भरून काढण्यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया वेगाने राबवावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. यासोबतच जिल्ह्यातील आश्रम शाळांची दुरवस्था, अपुऱ्या सुविधा व शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असलेल्या परिणामांबाबतही त्यांनी सखोल माहिती दिली.
“जिल्ह्यातील प्रश्न केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष मार्गी लागावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा आवश्यक आहे,” असे सांगत डॉ. होळी यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी आपण शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुलजी नार्वेकर यांनीही या सर्व विषयांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना निर्देश देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील रस्ते, सिंचन, शिक्षण व आदिवासी विकासाशी संबंधित प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

