
– प्रशासनाकडून तांत्रिक अडचणीचे कारण, निधीच्या अर्धवट वितरण प्रणालीवर प्रश्न चिन्ह?
गडचिरोली – अहेरी उपविभागातील नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांची बोनसच्या रकमेसाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ उप प्रादेशिक कार्यालय आणि तहसील कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी शेकडोंच्या संख्येने भेट देऊन निवेदन सादर करत प्रत्यक्ष जाब विचारला असता शिष्टमंडळाला 10 दिवसात बोनसची प्रोत्साहन राशीचे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन आदिवासी उप प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक सदानंद राजुरे तसेच तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की, 25 मार्च रोजी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने धान उत्पादक शेतकऱ्यांना लागवडी खालील जमीन धारणेनुसार प्रती हेक्टरी वीस हजार रुपये मर्यादेत दोन हेक्टर पर्यंत प्रोत्साहन पर बोनसची रक्कम वितरण करण्याचे आदेश पारित केले होते, त्यानंतर आदिवासी विविध सहकारी संस्था मार्फत नोंदणीकृत असलेल्या उपविभागातील पात्र शेतकऱ्यां पैकी पाच तालुक्यातील हजारो शेतकरी पाच महिन्याची कालावधी लोटून सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे बोनसच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी निवेदन सादर करत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नाराजीचा रोष व्यक्त केले आहे .
निवेदन सादर करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत, पवन आत्राम, बाबुराव दुर्गे,नंदू दब्बा, बाबुराव दुर्गे अमसा कुळमेथे, जगन्नाथ कुळमेथे यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


