
प्रेस नोट (प्रसिद्धीपत्रक)

दिनांक: १५ नोव्हेंबर २०२६
• आदर्श मीडिया असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रियाताई झांबरे यांनी उठवला बुलंद आवाज; कोलकाता ते मुंबईपर्यंत उच्चस्तरीय तक्रार दाखल.

• ७ दिवसांत अतिक्रमण न हटवल्यास न्यायालयाच्या माध्यमातून दोषींवर उगारणार फौजदारी कारवाईचा बडगा!
चंद्रपूर / दुर्गापूर:
केंद्र शासनाच्या अखत्यारीतील महारत्न कंपनी कोल इंडियाची प्रमुख उपकंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) च्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मौल्यवान सरकारी जमिनीवर भू-माफियांकडून कब्जा करण्याचा मोठा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत दुर्गापूर येथील वेकोलीच्या मालकीच्या जमिनीवर (भूमापन क्रमांक ७९ , ७/१२ उताऱ्यानुसार) ‘थोरात नगरी’च्या कथित मालकांकडून मोठ्या प्रमाणावर अवैध अतिक्रमण करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की, असे कोणते भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक राजकीय नेते आहेत, ज्यांच्या आशीर्वादाने केंद्र सरकारच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर हा अवैध कब्जा सुरू आहे?
प्रियाताई झांबरे यांनी उठवला बुलंद आवाज: लवकरच होणार मोठा पर्दाफाश
या गंभीर भ्रष्टाचाराविरोधात आणि सरकारी जमिनीच्या लुटीविरोधात ‘आदर्श मीडिया असोसिएशन’च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रियाताई झांबरे यांनी बुलंद आवाज उठवला आहे. प्रियाताई झांबरे हा संपूर्ण विषय ठोस पुराव्यांसह वेकोली (WCL) आणि कोल इंडियाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. या जमीन घोटाळ्यात सामील असलेल्या प्रत्येक चेहऱ्याचा लवकरच मोठा पर्दाफाश होईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
कागदपत्रांवरून उघड झाली मिलीभगत:
असोसिएशनने गोळा केलेल्या सरकारी कागदपत्रांवरून (७/१२ उतारा, नमुना-८ आणि जिल्हा परिषदेचे विभागीय चौकशी पत्र) हे स्पष्ट होते की, वेकोली चंद्रपूर, ग्रामपंचायत दुर्गापूर आणि ग्रामपंचायत ऊर्जानगर येथील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे अतिक्रमण शक्यच नव्हते:
* ७/१२ उताऱ्यावर वेकोली मालक, तरीही अवैध कब्जा: महसूल रेकॉर्डमध्ये जमिनीची मालकी स्पष्टपणे ‘वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड, दुर्गापूर’च्या नावावर नोंदवलेली आहे.
* ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये फेरफार: यापूर्वी जिल्हा परिषदेच्या चौकशी अहवालातही ग्रामपंचायत दुर्गापूरने कोणत्याही वैध मालकी हक्काच्या पुराव्याशिवाय नमुना-८ मध्ये बनावट नोंदी (Entries) केल्याचे आणि लाखो-कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे.
सर्वोच्च स्तरावर तक्रार दाखल:
राष्ट्रहित आणि सरकारी मालमत्तेच्या रक्षणासाठी असोसिएशनच्या वतीने या महाघोटाळ्याची तक्रार खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे:
१. कोल इंडिया लिमिटेड (कोलकाता): अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (CMD) आणि मुख्य दक्षता अधिकारी (CVO).
२. वेकोली मुख्यालय (नागपूर) व चंद्रपूर: अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्य दक्षता अधिकारी (CVO) आणि क्षेत्रीय महाप्रबंधक (CGM), चंद्रपूर.
३. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन: अपर मुख्य सचिव (ग्रामविकास व पंचायतराज, मुंबई), विभागीय आयुक्त व उपायुक्त (नागपूर), जिल्हाधिकारी (चंद्रपूर), मुख्य कार्यकारी अधिकारी (जिला परिषद चंद्रपूर) तसेच ग्रामपंचायत दुर्गापूर व ऊर्जानगर.
प्रशासनाला थेट अल्टीमेटम: अन्यथा न्यायालयामार्फत फौजदारी कारवाई
सर्व संबंधित सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. जर आगामी ७ दिवसांच्या आत वेकोली चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा परिषद चंद्रपूर किंवा ग्रामपंचायत दुर्गापूर व ऊर्जानगर यांनी अतिक्रमणधारक आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारी (Criminal) कारवाई केली नाही, तर असोसिएशनच्या वतीने माननीय न्यायालयाच्या मदतीने थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असे आदर्श मीडिया असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रियाताई झांबरे यांनी प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे.

