
गडचिरोली जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी घेतली निवासस्थानी भेट;जनसेवेसाठी अधिक बळ आणि ऊर्जा मिळाल्याची राजेंची भावना.

अमोल मारकवार|तालुका प्रतिनिधी
अहेरी: अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर रोजी अहेरी येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजेंना शुभेच्छा दिल्या.आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्याला राजमाता राणी रुक्मिणीदेवी, कुमार अवधेशराव बाबा आत्राम आणि प्रविणराव बाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही राजेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.राजघराण्यातील सदस्य, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते, राजे धर्मराव शिक्षण मंडळातील कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी राजेंची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. अहेरी येथील राजमाता राणी रुक्मिणीदेवी महाल परिसरात सायंकाळी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.
सामाजिक उपक्रमांतून वाढदिवस साजरा
राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी केवळ शुभेच्छांपुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य दिले. अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांत रुग्णांना फळवाटप, गरीब व गरजू नागरिकांना आर्थिक मदत तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करून कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
दिवसभर विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर सायंकाळी कार्यकर्ते आणि चाहत्यांनी राणी रुक्मिणीदेवी महाल परिसरात मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी बालकांपासून तरुणांपर्यंत तसेच महिला चाहत्यांचीही मोठी उपस्थिती होती. राजेंना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत छायाचित्रे व सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची रांग लागली होती. महालासमोरील पटांगणात करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सोहळ्याला आणखी रंगत आली आणि संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
राजकारणाच्या पलीकडे जपलेले जिव्हाळ्याचे संबंध
राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हितचिंतकांनीही त्यांची भेट घेतली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांशी प्रेमाने आणि जिव्हाळ्याने संबंध जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्याप्रती अनेकांनी आपुलकी व्यक्त केली.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांतून पदाधिकारी/कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थिती लावल्याने राजेंप्रती असलेला स्नेह आणि जिव्हाळा या निमित्ताने दिसून आला. वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रम, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि शुभेच्छा देण्यासाठी झालेली गर्दी यामुळे अहेरी परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
आपल्या शुभेच्छा जनसेवेसाठी नवी ऊर्जा देतील.
वाढदिवसानिमित्त मिळालेल्या भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना राजे अम्ब्रिशराव महाराज म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही समस्त कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात माझा वाढदिवस साजरा करून प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मला जनसेवेच्या कार्यात अधिक बळ आणि ऊर्जा देणारे ठरतील, असा मला विश्वास आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि चाहत्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
एकूणच, राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती, चाहत्यांचा उत्साह आणि महाल परिसरातील जल्लोषाने अहेरी येथे मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

