
बससेवा बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल; डॉ. अजय कंकडालवार यांनी घेतली दखल, एसटी महामंडळाकडून रस्ता पाहणीचे आश्वासन!

जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
अहेरी,दि.१६ ऑक्टोबर:

शाळकरी विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांचे व्यवहार आणि सर्वसामान्य नागरिकांची दैनंदिन कामे अडचणीत! अहेरी ते वेंकटापूर मार्गावरील बंद पडलेली एसटी बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली आहे. बससेवा बंद असल्यामुळे वेंकटापूरसह परिसरातील गावांमधील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, आता तरी लालपरी धावणार कधी, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती!
वेंकटापूर आणि परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी अहेरी येथील शाळा व महाविद्यालयांमध्ये ये-जा करतात. मात्र, बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दररोजचा खासगी प्रवास गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गरीब विद्यार्थ्यांनी दररोज खासगी वाहनाने शाळेत कसे जायचे? शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी तातडीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी डॉ. कंकडालवार यांनी केली आहे.
शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचीही गैरसोय
अहेरी हे परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ठिकाण असल्याने शेतीसाठी आवश्यक रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अहेरी येथे यावे लागते. मात्र, बससेवा बंद असल्यामुळे त्यांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून, प्रवासाचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
याशिवाय बाजारपेठेत जाणे, रुग्णालयात उपचार घेणे, बँकेची कामे पूर्ण करणे आणि शासकीय कार्यालयांमध्ये जाणे यांसारख्या दैनंदिन गरजांसाठीही नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनाही या समस्येचा सामना करावा लागत असल्याने बससेवा पूर्ववत करण्याची मागणी जोर धरत आहे.
ग्रामस्थांची व्यथा; कंकडालवार यांची तातडीने दखल
वेंकटापूर व परिसरातील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन बंद बससेवेची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. ग्रामस्थांची अडचण समजून घेतल्यानंतर डॉ. कंकडालवार यांनी तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला.
त्यांनी अहेरी आगाराचे व्यवस्थापक तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी अंकुश कंडेलकर यांच्याशी चर्चा करून अहेरी–वेंकटापूर मार्गावरील बससेवा त्वरित सुरू करण्याची मागणी केली.
यावेळी श्री. कंडेलकर यांनी या मागणीची दखल घेत प्रथम संबंधित रस्त्याची पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर बससेवा सुरू करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे.
लालपरीच्या प्रतीक्षेत वेंकटापूरकर!
बससेवा सुरू होण्याच्या आश्वासनामुळे वेंकटापूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र, केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष बससेवा सुरू होऊन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
अहेरी–वेंकटापूर मार्गावर एसटी बस सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर होईल, शेतकऱ्यांना बाजारपेठेत पोहोचणे सोयीचे होईल आणि सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे संबंधित परिवहन विभागाने रस्त्याची पाहणी करून विनाविलंब बससेवा सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

