
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली : तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)ची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम करण्यासाठी रविवारी (दि. ५ जुलै) भगवंतराव महाविद्यालयात पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने बूथस्तरावर सक्षम यंत्रणा उभी करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.
ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाचे प्रतिनिधी सक्रिय ठेवणे, बूथ लेव्हल एजंट (बी.एल.ए.) नियुक्त करणे आणि मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क राखण्यासाठी नियोजन करण्यात आले.

यावेळी पक्ष संघटनेचा विस्तार गावपातळीपर्यंत प्रभावीपणे करण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याबरोबरच नव्या चेहऱ्यांना पक्षाशी जोडण्याचे आवाहन करण्यात आले. संघटनात्मक शिस्त, जबाबदारीचे वाटप आणि निवडणूकपूर्व तयारी या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली.
बैठकीला एटापल्ली तालुकाध्यक्ष संभाजी हिचामी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजूभाऊ चरडुके , माजी सभापती सौ. बेबी नरोटे, महिला अध्यक्ष सौ. पौर्णिमा श्रीरामवार , माजी सभापती सौ बेबी नरोटे, श्री. लक्ष्मण नरोटे, श्री राजु नरोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी सभापती, उपसभापती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पक्षाचे विविध पदाधिकारी तसेच तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बैठकीच्या समारोपावेळी आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद निर्णायक ठरणार असल्याने प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात सक्रिय राहून पक्षाची विचारधारा आणि कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

