
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून लाभार्थी कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत
आर्थिक साक्षरता आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम
प्रतिनिधी|गडचिरोली

आर्थिक साक्षरतेबरोबरच सामाजिक सुरक्षा योजनांविषयी प्रभावी जनजागृती केल्यास संकटाच्या काळात नागरिकांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो, याचा प्रत्यय गडचिरोली तालुक्यात आला आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या लाभार्थ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला २ लाख रुपयांच्या विमा दाव्याची मदत प्रदान करण्यात आली.
असेस डेव्हलोपमेंट सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून RBI–Money Wise वित्तीय साक्षरता केंद्र गडचिरोली तालुक्यात कार्यरत असून, तालुक्यातील जवळपास ५० टक्के गावांमध्ये आर्थिक साक्षरतेचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत नागरिकांना घरगुती अर्थसंकल्प, बचतीचे महत्त्व, बँकिंग सेवा, आर्थिक नियोजन, विमा योजना आणि सामाजिक सुरक्षा योजनांबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच PMJJBY, PMSBY, APY यांसारख्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि नवीन बँक खाते उघडण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजनही करण्यात येते.
या अभियानाचा भाग म्हणून १५ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली तालुक्यातील राखी येथे Money Wise वित्तीय साक्षरता केंद्र आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये आयसीआरपी योगिता कोठारी, कृषी सखी पल्लवी बोदलकर आणि उदय काकपुरे यांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली. याच शिबिरात पुरुषोत्तम दयाराम बोदलकर यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभाग नोंदविला होता.
मात्र, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पुरुषोत्तम बोदलकर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विमा दावा सादर करण्यात आला. दावा मंजूर झाल्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा पुरुषोत्तम बोदलकर यांना २ लाख रुपयांच्या विमा दाव्याचा धनादेश प्रदान करण्यात आला.
बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक अंशुल कुमार आर्या तसेच जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक (LDM) प्रशांत धोंगळे यांच्या हस्ते लाभार्थी कुटुंबाला धनादेश सुपूर्द करण्यात आला.
या घटनेमुळे आर्थिक साक्षरता आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, नागरिकांनी अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

