
प्रतिनिधी/रुपेश सलामे
गडचिरोली : कार्यालय नगर परिषद, गडचिरोली येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सकाळी ०७.४५ वाजता नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. सुर्यकांत पिदुरकर, विविध विभागांचे सभापती, नगर परिषदेचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगर परिषद उच्चश्रेणी प्राथमिक शाळा, रामपूर, गडचिरोली येथील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थीही कार्यक्रमास उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर नगराध्यक्ष अँड. प्रणोती निंबोरकर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिवादन केले.
यानंतर नगर परिषद उच्चश्रेणी प्राथमिक शाळा, रामपूर, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका नैना चन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक संगीत कवायत सादर केली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध व देशभक्तीपर सादरीकरणाचे नगराध्यक्षांनी विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, सह सचिव तथा अभियान संचालक, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमांच्या अनुषंगाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ७७ वा प्रजासत्ताक दिन – २०२६ साजरा करण्याबाबतप्राप्त मार्गदर्शन सूचनांच्या अनुषंगाने नगर परिषद गडचिरोलीच्या नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाच्या वतीने “Swachh Aadat se Swachh Bharat” (स्वच्छ आदत से स्वच्छ भारत) या संकल्पनेअंतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, स्मारके, मोकळ्या जागा तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
तसेच नगर परिषदेच्या वतीने हा संपूर्ण कार्यक्रम “झिरो वेस्ट इव्हेंट” म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान कचरा कमी निर्माण होईल, त्याचे योग्य वर्गीकरण व व्यवस्थापन करण्यात येईल, याची विशेष काळजी घेण्यात आली. कार्यक्रमानंतर कार्यक्रमस्थळाची तात्काळ स्वच्छता करण्यात आली.

