
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची / दिनांक7 डिसेंबर 2025 – शिक्षणक्षेत्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक भान जपणारे प्रशासक प्राचार्य डॉ. जयदेव देशमुख यांच्या निधनानंतर आज चिखल पहेला जिल्हा भंडारा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत वातावरण भावविव्हल झाले. दीर्घ आजाराशी झुंज देत प्राचार्य डॉ. देशमुख यांचे दिनांक 6 डिसेंबर 2025 ला निधन झाले होते. इंदिरा शिक्षण संस्था आरमोरी द्वारा संचालित वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची येथे ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या स्मरणार्थ इंदिरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा बाबासाहेब भातकुलकर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, आदर्श महाविद्यालय देसाईगंजचे माजी प्राचार्य शंकरलाल कुकरेजा, माजी प्राचार्य डॉ पी. एस. बाळबुद्धे, माजी प्राचार्य डॉ कोकोडे सर, विद्यमान प्राचार्य डॉ श्रीराम गहाणे, प्राचार्य डॉ. कामडी सर, डॉ. नरेंद्र आरेकर सर, श्री सुरेश वासनिक, श्री रामरतन केवट, श्री रवी मेश्राम विविध संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, विविध प्राचार्य, शिक्षकवृंद, ग्रामवासी आणि नातलग, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. newsjagar
अनेक मान्यवर उपस्थितांनी त्यांच्या कार्याची, शिस्तप्रिय नेतृत्वाची आणि विद्यार्थ्यांविषयीच्या कळकळीची आठवण करत श्रद्धांजली वाहिली. वक्त्यांनी सांगितले की, डॉ. देशमुख यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे साधन मानून आपल्या कार्यकाळात अनेक उपक्रम राबवले, जे आजही संस्थेच्या कार्यपद्धतीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी दिलेली शिकवण विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि माणुसकी शिकवणारी होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच डी पदवी प्राप्त केली. अजूनही अनेक संशोधक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य करीत होते. त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यकाळात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील अधिसभा आणि समित्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी नुटा या शिक्षकांच्या संघटनेचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविले होते. अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण प्राप्त करून कठोर परिश्रमाने आपल्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. एवढ्या उच्च पदावर असतांनाही गावाशी जुळलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. गावातील प्रत्येक महत्वाच्या उपक्रमात त्यांचे महत्वपूर्ण योगदान असायचे अशी माहिती उपस्थित ग्रामवसियांनी नमूद केली.

शोकसभेत उपस्थित सर्वांनी डॉ. देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत, त्यांनी उभारलेल्या मूल्यांचे आणि शैक्षणिक कार्याचे संवर्धन हेच त्यांना खरी श्रद्धांजली राहील, अशी भावना व्यक्त केली.
शोकसभेच्या शेवटी दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळून उपस्थितांनी
त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक योगदानाचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

