
आमदार रामदास मसराम यांनी घेतली रुग्णांची भेट, तत्काळ मदतीच्या सूचना
आरमोरी – आरमोरी तालुक्यातील डोंगरसावांगी (ता. आरमोरी) येथील एका महिलेवर सोमवारी सकाळी वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीररीत्या जखमी झाली असून तिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच आरमोरी विधानसभे चे आमदार रामदास मसराम यांनी तत्काळ रुग्णालयात भेट देऊन जखमी महिलेची विचारपूस केली. त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधून योग्य व तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच घटनेबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीडित कुटुंबाला शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही आमदार मसराम यांनी दिल्या.

आमदार मसराम यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यात वारंवार वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. नागरिकांचे जीव वाचवणे आणि त्यांना योग्य भरपाई मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. यासाठी वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात,” असे ते म्हणाले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
हल्ल्याच्या घटनेने पुन्हा एकदा मानवी वस्तीजवळ वन्यजीवांच्या वाढत्या वावराचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे.

