
गुरुद्वारा सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्याशी सदिच्छा भेट; विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा

जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
सावली, दि. १८ नोव्हेंबर : किसाननगर येथील नागरिकांच्या विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी पुढाकार घेतला आहे. श्री गुरुनानक शाही गुरुद्वारा सेवा समिती, किसाननगर येथील पदाधिकाऱ्यांनी डॉ. अशोक नेते यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी किसाननगर परिसरातील स्थानिक समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच परिसरातील विविध प्रलंबित प्रश्न डॉ. नेते यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. तसेच नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, श्री गुरुनानक जयंतीच्या पावन पर्वानिमित्त किसाननगर येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री गुरुनानक शाही गुरुद्वाराला भेट द्यावी व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे निमंत्रण समितीच्या वतीने डॉ. अशोक नेते यांना देण्यात आले.
यावेळी पम्मी सलुजा यांच्यासह किसाननगर गुरुद्वारा सेवा समितीचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी व समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किसाननगरच्या समस्या सोडविण्यासाठी डॉ. अशोक नेते यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

