
डॉ. किशोर नैताम फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप

गडचिरोली/भामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा आणि फोदेवाडा या गावांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच गरजू कुटुंबांना मदतीचा हात देत डॉ. किशोर नैताम फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. धरती आबा भगवान बिरसा मुंडा आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना पुस्तके व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू कुटुंबांना धान्याचे वितरण करून त्यांना आधार देण्यात आला.
भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम आणि शैक्षणिक सुविधांपासून काही प्रमाणात दूर असलेल्या या गावांतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, वाचनाची आवड वाढावी आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य देण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना अन्नधान्याची मदत करण्यात आल्याने या उपक्रमाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाली.

यावेळी फाउंडेशनच्या सचिव डॉ. सुमती नैताम यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी फाउंडेशन सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या हातात दिले जाणारे पुस्तक हे केवळ शैक्षणिक साहित्य नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा देणारे साधन आहे. ग्रामीण तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमादरम्यान फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. रावजी नैताम, श्री. कैलास कोरेत, आलापल्लीचे सरपंच श्री. शंकर मेश्राम, बिनागुंडाचे पोलीस पाटील श्री. रामा दुर्वा तसेच विनोबा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शागिर्द शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. फोदेवाडा गावातील नागरिकांनीही या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
भामरागडसारख्या अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची प्रेरणा पोहोचविण्यासोबतच गरजू कुटुंबांना मदतीचा आधार देणारा डॉ. किशोर नैताम फाउंडेशनचा हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्व, मानवी संवेदना आणि सेवाभावाचा प्रेरणादायी आदर्श ठरला.

