
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली (अहेरी),दि.१८ नोव्हेंबर : आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्यासाठी संड्रा गावात गोटूलची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या संड्रा गावातील गोटूल बांधकामासाठी खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांच्या माध्यमातून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांना सादर करण्यात आले.
संड्रा गावात आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून, येथील आदिवासी बांधवांच्या पारंपरिक रूढी-परंपरा, संस्कृती, कला आणि सामाजिक एकोपा जतन करण्यासाठी गोटूलची नितांत आवश्यकता आहे. गोटूल हे केवळ एक वास्तू नसून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचे, सामाजिक एकतेचे आणि नव्या पिढीला संस्कार देणारे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. त्यामुळे गावात गोटूलची उभारणी होणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या गावात गोटूलसाठी स्वतंत्र इमारत व आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने आदिवासी समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती यांना सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक नृत्य, सामाजिक बैठका तसेच विविध सामूहिक उपक्रम आयोजित करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, आदिवासी संस्कृती आणि परंपरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.
ही बाब लक्षात घेता खासदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत संड्रा गावातील गोटूल बांधकामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात यावा. तसेच संबंधित विभागामार्फत जागेची पाहणी करून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी आणि गोटूल बांधकामाला मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
यावेळी काँग्रेस नेते डॉ. अजय कंकडालवार यांनी आदिवासी समाजाची संस्कृती आणि पारंपरिक वारसा जतन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत, संड्रा गावातील गोटूल बांधकामासाठी खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडे योग्य तो पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही गावकऱ्यांना दिली.
आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या गोटूलच्या उभारणीसाठी आता खासदार निधीतून मदत मिळण्याची आशा संड्रा ग्रामस्थांना लागली आहे.

