
शाळेला साहित्य पुरवठा न करताच खरेदी दाखवल्याचा आरोप; दोषींवर फौजदारी कारवाईची छत्रपती सेनेची मागणी

जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टेंभा ग्रामपंचायतीमध्ये शासकीय निधीतून साहित्य खरेदीच्या नावाखाली लाखो रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेंभा येथे कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच आरओ यंत्रणा पुरविल्याचे कागदोपत्री दाखविले असले, तरी प्रत्यक्षात हे साहित्य ग्रामपंचायतीमार्फत खरेदी अथवा पुरवठा करण्यात आले नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच शासनाच्या निधीची वसुली करावी, अशी मागणी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सदस्य, जिल्हा नियोजन समिती अरविंद कात्रटवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तक्रारीनुसार, टेंभा जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायतीने साहित्य पुरविल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र शाळा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या लेखी माहितीनुसार, कॉम्प्युटरची खरेदी शाळेने स्वतः केली असून लॅपटॉपचा पुरवठा क्युरीयन सर्व्हिस मुंबई यांच्याकडून झाला आहे. प्रोजेक्टर एलएलएफ अंतर्गत प्राप्त झाला आहे. स्मार्ट टीव्ही डॉ. उमेश पी. समर्थ यांनी भेट म्हणून दिला असून सीसीटीव्ही कॅमेरे श्री. मोहन के. ठाकरे यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची आरओ व्यवस्था देखील एलएलएफ-सी (एनपीसीआय) अंतर्गत करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे प्रत्यक्षात इतर माध्यमातून प्राप्त झालेल्या साहित्याची ग्रामपंचायतीने स्वतः खरेदी केल्याचे दाखवून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
७ सप्टेंबरची तक्रार; अद्याप चौकशी नाही
या कथित भ्रष्टाचाराबाबत टेंभा ग्रामस्थांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. मात्र तक्रार करूनही अद्याप ठोस चौकशी किंवा कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासकीय पातळीवरून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे का, अशी शंकाही ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आठवडाभरात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
टेंभा ग्रामपंचायतीतील साहित्य खरेदी प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि शासनाच्या निधीची वसुली करावी. आठवडाभरात कारवाई न झाल्यास छत्रपती सेनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयासमोर टेंभा येथील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अरविंद कात्रटवार यांनी निवेदनातून दिला आहे.
या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी कमलाकर पिठाले, हिराजी ठाकरे, गणेश वाघमारे, भारत नैताम, प्रफुल्ल डोईजड, चरण मुंघाटे, वेणुदास धारणे, रुपेश ठाकरे, शुभम अंबादे, प्रवीण गेडाम, योगीराज समर्थ, तुलाराम नैताम, लुमाजी मुंघाटे, देविदास कुमरे, लोकेश नैताम, पंकज नैताम, लंकेश राऊत, साहिल भोयर, रघुनाथ ठाकरे, राहुल ठाकरे, जगदीश मुंघाटे, दशरथ नारन्नवरे, पुरुषोत्तम गंडाटे, विष्णुदास कारमेंगे, समर कस्तुरे, सोहम उईके, ओम पेंदाम, वेदांत कस्तुरे, गजानन ठाकरे, चंद्रकांत कोलते, आशिष मुंघाटे आदी उपस्थित होते.

