
वनराई बंधाऱ्यांमुळे पाणी अडविण्यासह शेतीला मोठा हातभार; सेवा संकल्प अभियानांतर्गत उपक्रम

चामोर्शी : सेवा संकल्प अभियानांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत लोकसहभागातून विविध मृद व जलसंधारणाची कामे राबविण्यात येत आहेत. याच अभियानाला प्रतिसाद देत प्रियदर्शनी गावात शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येत वनराई बंधारे उभारून जलसंधारणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली गावातील छोट्या-मोठ्या ओढ्यांवर लोकसहभागातून वनराई बंधारे तयार करण्यात आले. पावसाळ्यात वेगाने वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यास तसेच उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी उपयोग करण्यास या बंधाऱ्यांची मदत होणार आहे. त्यामुळे भूजलपातळी वाढण्यासह आगामी काळात पिके व जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यास हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमावेळी उपकृषी अधिकारी डोंगरे, सहाय्यक कृषी अधिकारी प्रदीप मुंडे, NRM समन्वयक दाकोटे (गडचिरोली), समूह सहाय्यक कु. नयन कुमरे, कृषीताई अनुराधा चौधरी यांच्यासह गावातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामात सहभाग नोंदविला. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी योग्य वापर करण्याचा मार्गही सुकर होणार आहे.
महिलांना कृषी योजनांबाबत मार्गदर्शन
दरम्यान, सहाय्यक कृषी अधिकारी प्रदीप मुंडे यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी कृषी विभागाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रियदर्शनी गावातील या उपक्रमातून ग्रामस्थांचा लोकसहभाग, जलसंधारणाची जाणीव आणि शेतीसाठी पाण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि उपलब्ध पाण्याचे संवर्धन करण्याच्या माध्यमातून प्रियदर्शनी गाव ‘पाणीदार’ करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

