
मंजेगावात पहिल्यांदाच शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री ओएसडी अनिरुद्ध पालकर यांचा थेट संवाद; शेतीपट्टे व सिंचन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

चामोर्शी | ५ ऑक्टोबर : रेगडी-हळदवाही क्षेत्रातील १९५८ पासून शेतीचे पट्टे मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आणि घोट क्षेत्रातील १४ गावांच्या सिंचनाचा गंभीर प्रश्न आता थेट राज्य सरकारच्या दरबारात पोहोचला आहे. मंजेगाव येथे प्रथमच या भागातील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे ओएसडी अनिरुद्धजी पालकर यांनी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद नरोटे व माजी खासदार अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत सात गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. विशेषतः शेतीचे पट्टे, सिंचन व्यवस्था आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी रोशन मेश्राम तसेच अभियंता विकास दूधबावरे उपस्थित होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच थेट चर्चा झाली.
“शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवणार”
यावेळी मार्गदर्शन करताना अनिरुद्ध पालकर यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील सर्वसामान्य आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. घोट क्षेत्रातील १४ गावांच्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात रोजगार व स्वयंरोजगाराची दालने उघडली जात असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून सामान्य नागरिकांना न्याय देणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी खासदार अशोक नेते यांनी भ्रमणध्वनीद्वारे थेट संवाद साधत उपस्थित शेतकरी व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे आणि डॉ. भारत खटी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
१४ गावांच्या सिंचन प्रश्नावर विशेष चर्चा
मंजेगाव, किसाननगर, मछली, चक चापलवाडा, जवाहरनगर, सिमूलतला, किसानगर, हळदवाही, हळदवाहीटोला, पेटतळा, भाडभीडी आदी परिसरातील शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोट क्षेत्रातील १४ गावांचा सिंचन प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, दिनेश मुजुमदार, विनोद किरमे, पलास घरामी, सुमेन विश्वास, राजू सातपुते, संदीप भोवरे, जितेन शहा, अंकुश तरफदार तसेच आयोजक माजी सरपंच रमेश लेकलवार, बाबुराव बर्लावार, विठ्ठल बोंमकंटिवार, वर्षा गर्तूलवार, गंगाधर रामटेके, विनायक डुबूलवार, वसंत तुंकलवार यांच्यासह शेतकरी, युवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गोरडवार यांनी केले, तर आभार रवींद्र गर्तूलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजेगाव येथील शेतकरी, पदाधिकारी व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.
१९५८ पासून प्रलंबित शेतीपट्ट्यांचा प्रश्न आणि १४ गावांचा सिंचन प्रश्न आता थेट सरकारच्या कानावर पोहोचल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

