
असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश; गडचिरोलीत शिवसेना (उबाठा )पक्षाची ताकद वाढली

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गडचिरोलीतील संघटनात्मक वाटचालीला मोठी चालना मिळाली असून, सरपंच संघटनेचे जिल्हा संघटक तथा माजी सरपंच तुषार मडावी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे गडचिरोली जिल्ह्यात ठाकरे पक्षात संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिवसेनेचे लोकसभा प्रमुख महेश केदारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच गडचिरोली जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तुषार मडावी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली.
गेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीत ठाकरे गटाच्या संपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून, विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवकांचा (उ.बा.ठा)शिवसेनेकडे वाढता कल दिसून येत आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली शहराध्यक्ष अमोल कुळमेथे यांनीही ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता तुषार मडावी यांच्या प्रवेशामुळे पक्षाच्या स्थानिक संघटनेला आणखी बळ मिळाले आहे.
तुषार मडावी यांचा ग्रामीण भागातील जनसंपर्क, सरपंच संघटनेतील सक्रिय भूमिका आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक अनुभव यामुळे त्यांच्या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्याने आगामी काळात संघटनात्मक विस्ताराला याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी, शेतकरी, कामगार आणि ग्रामीण जनतेच्या हक्कांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून अधिक ताकदीने लढा उभारणार,” असा निर्धार तुषार मडावी यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे गडचिरोलीत शिवसेनेला (उ.बा.ठा)नवचैतन्य मिळाले असून आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

