
नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली(चामोर्शी ): चामोर्शी शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या लालडोंगरी तसेच मटन मार्केट परिसरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेचा तातडीने लाभ देण्यात यावा, अशी जोरदार मागणी शिवसेना (शिंदे गट) चामोर्शी तालुकाप्रमुख पप्पी पठाण यांनी केली आहे.

शासनाच्या विविध घरकुल योजना गरिबांना “हक्काचा निवारा” मिळवून देण्यासाठी राबविल्या जात असताना, चामोर्शीतील लालडोंगरी आणि मटन मार्केट परिसरातील अनेक पात्र कुटुंबे अद्यापही घरकुलाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. काही कुटुंबांना आजही झोपड्यांमध्ये अथवा अपुऱ्या आणि असुरक्षित निवाऱ्यात जीवन कंठावे लागत आहे.
पावसाळ्यात घरात पाणी शिरणे, उन्हाळ्यात असह्य उकाडा आणि हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत असल्याने या कुटुंबांचे जीवन अत्यंत हालाखीचे झाले आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अशा असुरक्षित परिस्थितीत राहण्याची वेळ येणे ही गंभीर बाब आहे, असे पप्पी पठाण यांनी नमूद केले.

घरकुल योजना कागदावर नको, प्रत्यक्ष लाभ मिळावा!
शासन आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांसाठी विविध घरकुल योजना राबवत आहे. मात्र, योजनेचे लाभ पात्र गरिबांपर्यंत पोहोचत नसतील तर या योजनांचा नेमका उपयोग काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रभाग क्रमांक ५ मधील लालडोंगरी व मटन मार्केट परिसरातील घरकुलापासून वंचित असलेल्या कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करून प्रत्यक्ष घरांची पाहणी करण्यात यावी. पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून शासनाच्या नियमानुसार त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी पठाण यांनी केली आहे.
“एकही पात्र कुटुंब घरकुलापासून वंचित राहू नये”
केवळ कागदोपत्री त्रुटी, प्रशासकीय विलंब किंवा प्रक्रियेच्या कारणामुळे एखादे पात्र गरीब कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित राहू नये. प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहण्याची गरज आहे, असे पप्पी पठाण यांनी सांगितले.
लालडोंगरी व मटन मार्केट परिसरातील अनेक कुटुंबे दीर्घकाळापासून येथे वास्तव्यास असून त्यांना कायमस्वरूपी, सुरक्षित आणि सन्मानाने जगता येईल असा निवारा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे चामोर्शी नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अन्यथा हा प्रश्न पुढील स्तरावर लावून धरला जाईल, अशी भूमिका शिवसेना तालुकाप्रमुख पप्पीभाऊ पठाण यांनी मांडली.
गरीबांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर येईपर्यंत हा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

