
काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या नळाच्या पाण्यात नारू आढळल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा धक्कादायक प्रकार; नागरिकांमध्ये संताप

प्रलय सहारे प्रतिनिधी
भेंडाळा,दि.५ ऑक्टोबर : गावातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना भेंडाळा येथे पाणीपुरवठ्याबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे. सूरज कोटांगले यांच्या घरातील नळाच्या पाण्यात चक्क दोन नारू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वीच भेंडाळातील एका व्यक्तीच्या नळाच्या पाण्यात नारू आढळल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता थेट घरातील नळाच्या पाण्यात दोन नारू आढळल्याने पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
नळाला येणारे पाणी नागरिकांच्या दैनंदिन वापरात तसेच पिण्यासाठीही वापरले जाते. अशा परिस्थितीत पाण्यात अशा प्रकारचे जीव आढळणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची, जलवाहिन्यांची, टाक्यांची तसेच पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेची नियमित तपासणी केली जाते का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
‘नागरिकांच्या जीवाशी खेळ कशासाठी?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत असून ग्रामपंचायतीने या घटनेची तातडीने दखल घेऊन संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी करावी, जलवाहिन्या व पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करावी आणि पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून नागरिकांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, एकाच परिसरात वारंवार पाण्याशी संबंधित अशा घटना समोर येत असताना ग्रामपंचायत प्रशासन आणखी किती गंभीर घटना घडल्यानंतर जागे होणार? असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.
या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी जोर धरत आहे.

