
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली

देसाईगंज : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रात उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या कार्यक्रम अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. सन २०२५-२६ या वर्षासाठी आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज येथील वाणिज्य शाखा प्रमुख तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश हलामी यांना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गोंडवाना विद्यापीठाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार नागपूर येथील लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉ. अतुल वैद्य आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आदरणीय डॉ. श्रीराम कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डॉ. निलेश हलामी हे सन २०१७-१८ ते २०२५-२६ या कालावधीत आदर्श महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी रासेयो स्वयंसेवकांच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय व जनजागृतीपर उपक्रमांचे प्रभावी आयोजन केले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याशी जोडत समाजोपयोगी उपक्रमांना त्यांनी विशेष प्राधान्य दिले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या रासेयो पथकाने विविध गावांमध्ये सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरांचे आयोजन केले. आमगाव, गांधीनगर, एकलपूर, बोलधा आदी गावांमध्ये आयोजित शिबिरांच्या माध्यमातून स्वच्छता, श्रमदान, पर्यावरण संवर्धन, आरोग्यविषयक जनजागृती, सामाजिक समता, व्यसनमुक्ती, महिला व युवक जनजागृती यांसह विविध विषयांवर उपक्रम राबविण्यात आले.
रक्तदान व आरोग्य जनजागृतीच्या क्षेत्रातही रासेयोच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करण्यात आले. रेड रिबन क्लब, रक्तदान शिबिरे, एचआयव्ही/एड्स जनजागृती, सिकलसेलविषयक जनजागृती तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आयोजित उपक्रमांमध्ये स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग राहिला. याशिवाय स्वच्छता अभियान, वैनगंगा नदीघाट स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, रस्ता सुरक्षा, सामाजिक समता व विविध राष्ट्रीय दिनांच्या निमित्ताने जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.
प्रा. डॉ. हलामी यांनी रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ‘समाजसेवा हीच राष्ट्रसेवा’ या भावनेची रुजवणूक करण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देणे, त्यांना स्वयंसेवी उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे आणि समाजाप्रती जबाबदारीची भावना निर्माण करणे, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले.
त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत गोंडवाना विद्यापीठाने सन २०२५-२६ चा विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. विशेष म्हणजे याच कालावधीतील उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श महाविद्यालयाच्या रासेयो एककालाही विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट रासेयो एकक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे कार्यक्रम अधिकारी आणि रासेयो एकक या दोन्ही स्तरांवर महाविद्यालयाला मिळालेले हे यश विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
या पुरस्काराबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. श्रीराम गहाणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक, विद्यार्थी तसेच विविध स्तरांतील मान्यवरांनी प्रा. डॉ. निलेश हलामी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या सन्मानामुळे आदर्श महाविद्यालयाच्या सामाजिक व राष्ट्रीय सेवा योजना कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून महाविद्यालयाच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

