
मनोज झाडे अध्यक्ष, प्रियंका डाकोटे उपाध्यक्ष; शाळेच्या शैक्षणिक विकासाला मिळणार नवी दिशा

नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली ( चामोर्शी) : पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत केंद्र गणपूर (रै.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली (तुकूम) येथे शैक्षणिक वर्षासाठी नव्याने शाळा व्यवस्थापन समितीची गठण करण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्यासाठी समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मनोज नानाजी झाडे, तर उपाध्यक्षपदी सौ. प्रियंका अतुल डाकोटे यांची निवड करण्यात आली. पालक सदस्य म्हणून मिथुन भाऊजी सरपे, सौ. शालू साईनाथ सरपे, सौ. शिल्पा मधुकर झाडे, अशोक डोनोजी गेडाम, अरविंद गणपती तिमाडे, सौ. शारदा आनंदराव सरपे आणि सौ. मनीषा साईनाथ कोसमशिले यांची निवड करण्यात आली.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून समृद्धी ऋषी घोगरे व पवन विकास शेडमाके, तर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी म्हणून दिलीप हनुमंत वर्धलवार यांची निवड झाली. स्थानिक शिक्षणप्रेमी म्हणून रजित बाबुराव नागापुरे यांची निवड करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक संतोष रामराव नागरगोजे हे शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
नवनिर्वाचित समितीच्या माध्यमातून शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती व शैक्षणिक प्रगती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, शालेय परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे, पालक तसेच ग्रामस्थांचा शाळेच्या विकासातील सहभाग वाढविणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे.
शाळा व्यवस्थापन समिती ही शाळा, पालक आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, नव्या समितीच्या माध्यमातून शाळेच्या विकासाला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच चांगले संस्कार, शिस्त आणि विविध कौशल्ये मिळावीत, यासाठी समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

