
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी

३० ते ६० किमीवरून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे; बीएसएनएलऐवजी पर्यायी नेटवर्कची मागणी
कोरची : तालुक्यातील विविध बँकांमध्ये गेल्या आठवडाभरापासून इंटरनेट लिंक वारंवार खंडित होत असल्याने बँकांचे आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले आहेत. कधी लिंक सुरू तर कधी बंद, अशा परिस्थितीमुळे ग्राहकांना मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कोरची तालुक्यात बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि को-ऑपरेटिव्ह बँक अशा विविध बँका आहेत. मात्र, या बँकांच्या व्यवहारांसाठी आवश्यक असलेले नेटवर्क वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांची कामे रखडत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेच्या कामासाठी ३० ते ६० किलोमीटर अंतरावरून कोरची येथे यावे लागते. बँकेत आल्यानंतर लिंक फेल असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दिवसभर प्रतीक्षा करूनही व्यवहार न झाल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
दुसऱ्या दिवशी पुन्हा बँकेत आल्यानंतरही परिस्थिती जैसे थेच राहत असल्याने नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि कामाचे नुकसान होत आहे. शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध शासकीय योजनांच्या पैशांसाठी बँकेत येणाऱ्या लाभार्थ्यांना याचा विशेष फटका बसत आहे.
बँकांचे व्यवहार सुरळीत राहण्यासाठी केवळ बीएसएनएलच्या नेटवर्कवर अवलंबून न राहता अन्य उपलब्ध नेटवर्कची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या नेटवर्क समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढून बँकिंग सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

