
शहरातील जपानी गार्डन परिसरात रविवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या कैलास सोनदीया यांना भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास जपानी गार्डन रोडवर हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, परिसरात तीन चारचाकी वाहने अतिवेगाने धावत होती. त्यापैकी एका इनोव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्या कैलास सोनदीया यांना जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की वाहनाचेही मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती समोर आली आहे. काही वृत्तांनुसार अपघातानंतर इतर वाहनांचा शोधही घेतला जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. “मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भरधाव वाहनांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केल्याची माहिती समोर आली आहे.

