
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
कुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम सुरू केली असून, कुरखेडा पोलिसांनी मोठी कारवाई करत देशी-विदेशी दारू आणि चारचाकी वाहनासह तब्बल ₹2 लाख 77 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
दि. 27 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांना अवैध दारू वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी वडसा–कुरखेडा मार्गावर सापळा रचला. यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी रिट्झ वाहनाला अडवून पोलिसांनी झडती घेतली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू आढळून आली.

जप्त केलेला मुद्देमाल
देशी दारू : 20 बॉक्स, एकूण 2,000 नग — ₹1,20,000
रॉयल स्टॅग विदेशी दारू : 96 नग — ₹38,400
सह्याद्री गोल्ड विदेशी दारू : 48 नग — ₹19,200
मारुती सुझुकी रिट्झ चारचाकी वाहन — ₹1,00,000
एकूण जप्त मुद्देमाल : ₹2,77,600/-
या प्रकरणी सौरभ संतोष डहाळे व मोहन लांजेवार या दोघांविरुद्ध पोलीस स्टेशन कुरखेडा येथे अप. क्र. 193/2026, कलम 65 (अ), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कुरखेडा पथकाने यशस्वीरीत्या केली.
अवैध दारूवाल्यांना पोलिसांचा इशारा!
गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री, वाहतूक आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांना थारा दिला जाणार नसून, अशा गैरप्रकारांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश कुरखेडा पोलिसांच्या या कारवाईतून मिळाला आहे.

