
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील गुम्मलकोंडा, मुकिडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा मोटला तसेच सुंकरली ते असरअल्ली या रस्त्याच्या पक्क्या डांबरीकरणाची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) सातत्याने लावून धरली होती. या रस्त्याचा प्रश्न भाकपाने जनतेचा प्रमुख मुद्दा बनवून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर सदर रस्त्याचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.
उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, सिरोंचा यांनी सदर पक्क्या रस्त्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे पाठविला आहे. सदर रस्ता जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत प्रस्तावित करण्यात आला असून, प्रस्ताव पाठविल्याची लेखी माहिती पत्राद्वारे कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना देण्यात आली आहे.
या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून खराब रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व खड्डे निर्माण होत असल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. रुग्णांना वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविणे, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाणे तसेच नागरिकांना तहसील व इतर शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी पोहोचणे कठीण होते.

या रस्त्याच्या प्रश्नावर भाकपाने सातत्याने निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. केवळ निवेदन देऊन न थांबता भाकपाने हा प्रश्न जनतेचा प्रमुख मुद्दा बनवून सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे उपविभागीय अभियंत्यांकडून सदर रस्त्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना 2026-27 मध्ये या रस्त्याचा प्रस्तावित समावेश होणे हे भाकपाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे आणि स्थानिक नागरिकांच्या संघर्षाचे महत्त्वपूर्ण यश असल्याचे भाकपाने म्हटले आहे.
कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “गुम्मलकोंडा, मुकिडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा मोटला तसेच सुंकरली ते असरअल्ली या रस्त्याचा प्रश्न भाकपाने सातत्याने लावून धरला आणि तो जनतेचा प्रमुख मुद्दा बनवून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेत उपविभागीय अभियंत्यांनी सदर रस्त्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविला असून, याची लेखी माहिती मला देण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजना 2026-27 मध्ये रस्ता प्रस्तावित होणे हे जनतेच्या संघर्षाचे आणि भाकपाच्या पाठपुराव्याचे महत्त्वपूर्ण यश आहे. मात्र केवळ प्रस्तावित करून आमचा लढा संपलेला नाही. आता या प्रस्तावाला तात्काळ प्रशासकीय व वित्तीय मंजुरी मिळवून प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू होणे आवश्यक आहे. मंजुरी प्रक्रियेत दिरंगाई झाल्यास जनतेला सोबत घेऊन तहसील कार्यालय, सिरोंचा समोर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल. या रस्त्याच्या मंजुरीसाठी भाकपा शेवटपर्यंत संघर्ष करेल.”
दरम्यान, भाकपाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी, कार्यालय अहेरी यांच्याकडे निवेदन देऊन गुम्मलकोंडा, मुकिडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा मोटला आणि सुंकरली ते असरअल्ली या संपूर्ण मार्गाला जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत तात्काळ प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सद्यस्थितीत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती व खडीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाकपाने स्पष्ट केले आहे की, जिल्हा वार्षिक योजना 2026-27 मध्ये प्रस्तावित होणे हे या लढ्याचे पहिले यश असून, आता प्रत्यक्ष मंजुरी मिळवून रस्त्याचे काम सुरू करणे हा पुढील टप्पा आहे. मंजुरी प्रक्रियेत दिरंगाई झाल्यास तहसील कार्यालय, सिरोंचा समोर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित होते : कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, भाकपा; कॉ. सुरज जककुलवार, जिल्हा सदस्य; कॉ. रवी बारसंगडी, तालुका सचिव, सिरोंचा तसेच भाकपाचे कार्यकर्ते आणि संबंधित गावांतील नागरिक उपस्थित होते.

