
दरार दुर्गा मंडळाच्या नेतृत्वाची धुरा आता संतोष ठाकुरवार यांच्या खांद्यावर!
शेकडो सदस्यांच्या उपस्थितीत नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड; मंडळाच्या सामाजिक-धार्मिक परंपरेला नवी दिशा देण्याचा निर्धार..
✒️जिल्हा प्रतिनिधी!
मूल : संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक व सर्व धर्म समभाव उपक्रमांमुळे वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मूल येथील दरार दुर्गा मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा मोठ्या उत्साहात करण्यात आली. दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी मूल शहरातील योगा भवन येथे मंडळाची वार्षिक सभा पार पडली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतभाऊ समर्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला शेकडो सदस्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

वार्षिक सभेत मंडळाच्या आगामी वर्षातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांचे नियोजन, भविष्यातील कार्यक्रमांची रूपरेषा आणि मंडळाच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित शेकडो सदस्यांच्या एकमताने नव्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.
संतोष ठाकुरवार अध्यक्षपदी; अनुभवी शिलेदारांची मजबूत टीम!
नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी संतोष ठाकुरवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी गणेश मेश्राम, सोमेश्वर झरकर व किशोर राऊत यांची निवड झाली. सचिवपदी प्रफुल तुंगीडवार, तर सहसचिवपदी अभय चिटलोजवार, अक्षय रामशेट्टीवार व प्रथम रेगुंडवार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. कोषाध्यक्षपदाची धुरा स्वप्नील श्रीरामे यांच्याकडे देण्यात आली.
कार्याध्यक्षपदी हर्षल धुळेवार, गोलू याटावार, आदर्श गेडाम, क्रिष्णा बोरवार, अनिकेत वाकडे, निलेश मायकलवार, सुमित कामडी, साजन गुज्जनवार, ओम उसेवार, जय कोडापे, ओम कामनपल्लीवार व नागेश कंकलवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
परंपरेसोबत नव्या जोमाने वाटचाल करण्याचे आवाहन..
सभेचे संचालन प्रमोद महाडोळे सर यांनी केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रशांत समर्थ यांनी अध्यक्षीय भाषणातून दरार दुर्गा मंडळाने आजवर जपलेली सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि सर्व धर्म समभाव उपक्रमांची समृद्ध परंपरा आगामी काळातही अधिक जोमाने पुढे नेण्याचे आवाहन केले.
“मंडळाची खरी ताकद ही त्याच्या सदस्यांच्या एकजुटीत आहे. प्रत्येक सदस्याने सक्रिय सहभाग घेत आगामी काळात दरार दुर्गा मंडळाचा नावलौकिक आणखी उंचावण्यासाठी योगदान द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
नव्या कार्यकारिणीची निवड होताच उपस्थित सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नव्या नेतृत्वाकडून मंडळाच्या आगामी उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळेल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. एकजुटीच्या बळावर मंडळाची सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचाल अधिक प्रभावी करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आलेला आहे .
सभेच्या शेवटी अनिल समर्थ यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर भोजनाच्या कार्यक्रमाने वार्षिक सभेची सांगता झाली.
शेकडो सदस्यांच्या उपस्थितीत झालेली ही निवड केवळ कार्यकारिणीची निवड न ठरता, दरार दुर्गा मंडळाच्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात ठरली आहे.
🖋️ Chetan Kamde News Jagar 🖋️

