
एटापल्ली : तालुक्यातील चोखेवाडा परिसरात शैक्षणिक आणि महसूल विभागाच्या अनियमित कारभारामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. चोखेवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नियमित शिक्षकाची नियुक्ती करावी, तसेच चोखेवाडा साझा क्रमांक ५ येथील तलाठ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी, या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी स्वतंत्रपणे संबंधित प्रशासनाकडे निवेदने सादर केली आहेत.
चोखेवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुमारे ३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत नियमित शिक्षकाची आवश्यकता असतानाही शिक्षकांची पुरेशी उपलब्धता नसल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळेत नियमित शिक्षकाची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती एटापल्ली यांच्याकडे निवेदन देऊन शाळेतील शिक्षकांच्या अनियमिततेबाबत लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, चोखेवाडा साझा क्रमांक ०५ येथील तलाठी कार्यालयातील अनियमित उपस्थितीचाही मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. निवेदनानुसार, तलाठी यांची चोखेवाडा येथे बदली होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र, कार्यालयात त्यांची नियमित उपस्थिती राहत नसल्याने शेतकरी व नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तलाठी कार्यालयात नियमित उपस्थिती नसल्यामुळे शेतजमिनीशी संबंधित कामे, विविध दाखले, फेरफार नोंदी तसेच अन्य महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना वारंवार एटापल्ली येथे जावे लागत असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असून, शासकीय सेवा मिळवण्यासाठी त्यांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी ग्रामस्थांनी तहसीलदार, तहसील कार्यालय एटापल्ली यांच्याकडे स्वतंत्र निवेदन सादर करून तलाठ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष चौकशी करावी आणि नागरिकांना त्यांच्या गावातच वेळेत महसूल सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न तर दुसरीकडे शेतकरी व नागरिकांच्या महसूलविषयक कामांचा प्रश्न निर्माण झाल्याने चोखेवाडा परिसरात प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित विभागांनी दोन्ही निवेदनांची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून तातडीने समस्या सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

