
चांदली बुज येथे उभ्या पिकांची जनावरांकडून नासधूस; गुराख्यांवर कारवाईची मागणी, इंटकचे वन विभागाला निवेदन
न्यूज जागर जिल्हा प्रतिनिधी.
चंद्रपूर..

सावली तालुक्यातील मौजा चांदली बुज येथे सामूहिक वनहक्क मंजूर झालेल्या जमिनीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे. त्यातच शेतकऱ्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या पिकांमध्ये गुरे, ढोरे, शेळ्या-मेंढ्या चारण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन १९७६ पासून अस्तित्वात असलेल्या वन अतिक्रमणधारकांचे क्षेत्र वगळून उर्वरित जागेवर वृक्षलागवड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, वन विभागाने या आदेशाची अंमलबजावणी न करता टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, सामूहिक वनहक्काच्या जमिनीवर लाभार्थ्यांनी घेतलेल्या उभ्या पिकांमध्ये गावातील काही गुराख्यांनी गुरे, ढोरे, शेळ्या व मेंढ्या चारल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानाबाबत जाब विचारला असता संबंधित गुराख्यांकडून “अमुक व्यक्तीने सांगितले”, “तमुक व्यक्तीच्या सांगण्यावरून जनावरे चारली”अशी कारणे दिली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, अशा प्रकारे दुसऱ्याचे नाव पुढे करून उभ्या पिकांची नासधूस करणे गंभीर स्वरूपाचे असून, संबंधित गुराख्यांवर तसेच त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने विभागीय वन अधिकारी (DFO) यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात सन १९७६ पासूनच्या अतिक्रमण क्षेत्राची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी व मोजणी करून उर्वरित जागेवर वृक्षलागवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पिकांच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाई द्यावी, पिकांचे नुकसान करणाऱ्या गुराख्यांवर व संबंधित जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित वन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अन्यथा शेतकरी व वनहक्कधारकांच्या न्यायासाठी वरिष्ठ स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा इंटकचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी दिला आहे.

