
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.३ जूलै:
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या वतीने ३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा करण्यात येत असून, त्याच्या शुभारंभानिमित्त सोमवारी (३ ऑगस्ट) जिल्हा सामान्य रुग्णालयातून भव्य अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात आली.

या रॅलीत शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अवयवदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “मृत्यूनंतरही अनेकांना नवजीवन देण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे अवयवदान. अवयवदान हे केवळ दान नसून मानवतेची सर्वोच्च सेवा आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करून या पवित्र कार्यात सहभागी व्हावे. चला, ‘अवयवदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया.”
रॅलीदरम्यान “अवयवदान हेच श्रेष्ठ दान”, “मृत्यूनंतरही जीवन देऊया” आणि “अवयवदान करा, जीवन वाचवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व, त्यामागील कायदेशीर प्रक्रिया आणि समाजासाठी त्याचे अमूल्य योगदान याविषयी माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उईके, भीषक तज्ज्ञ डॉ. मनीष मेश्राम, आशा बावणे (सहाय्यक अधिसेविका), श्रीमती फेबूलवार (सहाय्यक अधिसेविका), रोटरी क्लबच्या अध्यक्षा मदत जीवणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीच्या समारोपावेळी सर्व नागरिकांना अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. अवयवदानामुळे अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक भूमिका घेत समाजात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
“अवयवदान हेच श्रेष्ठ दान – आजचा संकल्प, उद्याचे नवजीवन!” हा प्रेरणादायी संदेश देत जनजागृती रॅलीचा समारोप झाला.

