
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची, दि. ३ ऑगस्ट :
वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय, कोरची येथील मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ तसेच ‘नशामुक्त युवा अभियान’ या कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. व्ही. टी. चहारे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सी. एस. मांडवे व प्रा. प्रदीप चापले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. आर. एस. रोटके उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. लेखन ही केवळ अभिव्यक्ती नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन करत विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन आणि सातत्यपूर्ण लेखनाची सवय जोपासावी, असे सांगितले. तसेच युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजात योगदान द्यावे, असा संदेश ‘नशामुक्त युवा अभियान’ अंतर्गत देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. दोनाडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जी. टी. देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जे. के. विनायक यांनी मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. बालक साखरे, श्री. प्रकाश मेश्राम तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य केले.

