
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली | प्रतिनिधी
एमआयडीसीच्या प्रस्तावित भूमी संपादनाला विरोध दर्शवत तसेच परिसरातील शेतकरी बांधवांना एकत्र आणण्यासाठी शेतकरी कृती समिती (जैरामपूर/येनापूर परिसर) यांच्या वतीने ‘शांततामय शेतकरी पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लक्ष्मणपूर येथून सुरू होऊन येनापूर मंडळ कार्यालयापर्यंत जाणार आहे.

या पदयात्रेत जैरामपूर, मुधोली चक क्र. २, मुधोली तुकूम, चित्तरंजनपूर, किष्टापूर, येनापूर, दुर्गापूर, सेलूर, लक्ष्मणपूर, गणपूर, विठ्ठलपूर, यादवपल्ली, पारडीदेव तसेच परिसरातील इतर गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पदयात्रेचा मार्ग लक्ष्मणपूर – दुर्गापूर – किष्टापूर – चित्तरंजनपूर – येनापूर असा निश्चित करण्यात आला आहे. ही पदयात्रा संविधानिक, अहिंसक आणि शांततापूर्ण पद्धतीने काढण्यात येणार असून, जमिनीचे संरक्षण आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकजुटीचा संदेश देण्यात येणार आहे.
“जमीन वाचवा – भविष्य वाचवा”, “शेती आमचा श्वास, जमीन आमचा विश्वास” अशा घोषणांसह शेतकरी आपल्या हक्कासाठी एकत्र येणार आहेत. आयोजकांनी सर्व शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांच्या मते, “आपली जमीन, आपले अस्तित्व आणि भावी पिढ्यांचे भविष्य वाचविण्यासाठी ही लढाई असून, शांततेच्या मार्गाने न्याय मिळविण्यासाठी हा लोकशाही पद्धतीने उभारलेला आवाज आहे.”

