
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील विविध मूलभूत प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांना संयुक्त निवेदन सादर करण्यात आले असून मोकाट जनावरांचा वाढता त्रास तसेच तलाव संरक्षण भिंत व रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.
एटापल्ली परिसरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ही जनावरे रस्त्यावर मुक्तपणे फिरत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासनाने नवीन कोंडवाडा तयार करूनही तो अद्याप सुरू करण्यात आलेला नसल्यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे हा कोंडवाडा तात्काळ सुरू करून मोकाट जनावरांची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, एटापल्ली गावातील तलावाभोवती बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट संरक्षण भिंतीची स्थितीही अत्यंत धोकादायक झाली आहे. भिंत व रस्त्याच्या मधील जागेत योग्य भराव व आधार न दिल्यामुळे भिंतीचा काही भाग कोसळला असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात माती वाहून जात आहे. परिणामी विद्यमान रस्ता खराब होत असून भविष्यात तलावाच्या पाणीसाठ्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या तलावाच्या पाण्यावर अनेक शेतकरी अवलंबून असल्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे.
या दोन्ही गंभीर प्रश्नांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरही परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी तात्काळ आवश्यक माती व साहित्य भरून संरक्षण भिंतीला मजबुती देणे आणि रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे.
कॉ. सचिन मोतकुरवार यांचे वक्तव्य:“एटापल्ली परिसरातील मोकाट जनावरांचा प्रश्न आणि तलाव संरक्षण भिंत व रस्त्याची धोकादायक अवस्था ही अत्यंत गंभीर बाब आहे. शासनाने कोंडवाडा तयार करूनही तो सुरू न करणे ही प्रशासनाची निष्काळजीपणा दर्शवते. तसेच संरक्षण भिंत व रस्ता दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठा अपघात किंवा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. प्रशासनाने तात्काळ या दोन्ही प्रश्नांवर कार्यवाही करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
सदर निवेदनावर स्थानिक शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सह्या करून पाठिंबा दर्शविला आहे. यात प्रमुख शेतकऱ्यांमध्ये विजय अतकमवार, अनिल करमरकर, बालाजी मोहूर्ले, साईनाथ झाडे, राजेश गावतुरे, मोहन बोरूले, जीवन मोहूर्ले, जगन्नाथ गुरूनुले, दिवाकर रापंजी पाटील, प्रभाकर कांबळे तसेच इतर ग्रामस्थांचा समावेश आहे.यावेळी CPI चे स्थानिक नेते कॉ. सुरज जककुलवार यांच्यासह कार्यकर्तेही उपस्थित होते व त्यांनी या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार (तसेच राज्य उपाध्यक्ष, AIYF) यांनी प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.स्थानिक पातळीवरील वाढत्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने विलंब न करता ठोस निर्णय घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

