
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
प्रेस नोट
गडचिरोली: –
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत प्राप्त प्रस्तावांबाबत व्यवस्थापकीय समिती व नियामक परिषद, जिल्हा खनिज प्रतिष्ठान गडचिरोलीची सभा जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या सभेत एटापल्ली तालुक्यातील एकूण 32 कामांना अंतिम मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

या मंजूर कामांबाबत आजाद समाज पार्टी वतीने जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे की, सदर सर्व कामे गडचिरोली जिल्ह्यातील सक्षम बेरोजगार स्थानिक ठेकेदारांना प्राधान्याने देण्यात यावीत.
आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले की, “बाहेरच्या ठेकेदारांना जिल्ह्यातील कामे दिल्यास कामाचा दर्जा घसरतो, आवश्यक ती आपुलकी आणि जबाबदारी दिसून येत नाही. जिल्ह्यातील ठेकेदारांना काम मिळाले नाही तर त्यांनी घेतलेल्या कर्जाचा परतावा करणे, खरेदी केलेली साधन सामुग्री टिकवणे कठीण होते. त्यामुळे स्थानिक ठेकेदार आर्थिक संकटात सापडतात. त्याचबरोबर, स्थानिक ठेकेदारांना काम मिळाल्यास जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होतो, ज्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळते.”
म्हणून, जिल्हा प्रशासनाने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून मंजूर सर्व 32 कामे गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांनाच देऊन स्थानिक विकासास चालना द्यावी, ही आजाद समाज पार्टीने जिल्हाधिकारीकडे मागणी केली. यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रवक्ते प्रितेश अंबादे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार उपस्थित होते.
NEWS JAGAR (आवाज सत्याचा)
गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी ( MR.SONU WALKE)

