
राजेंद्र मर्दाने
वरोरा : वरोरा शहराच्या क्रीडा इतिहासात अभिमानाची नोंद करणारी कामगिरी करत लोकशिक्षण संस्था, वरोरा तथा वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशनची खेळाडू ईश्वरी विलास राऊत हिची थायलंड येथे १ ते ७ जुलै दरम्यान होणाऱ्या ज्युनिअर आशियाई व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे वरोराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विशेष म्हणजे, तब्बल २७ वर्षांनंतर वरोऱ्यातील एखाद्या खेळाडूला भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी सज्जिया शेख आणि मणिमूर्ती बच्चू यांची सिंगापूर येथे झालेल्या शालेय आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. त्यानंतर आता ईश्वरीने ही ऐतिहासिक कामगिरी करून शहराच्या क्रीडा परंपरेला नवे सुवर्णपान जोडले आहे.
लोकशिक्षण संस्थेची माजी विद्यार्थिनी असलेल्या ईश्वरीने आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सध्या ती विशाखापट्टणम येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात उच्चस्तरीय प्रशिक्षण घेत आहे.
ईश्वरीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील तसेच वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांनी तिचे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या यशाचे श्रेय ईश्वरीने आई-वडील, संस्थेचे कार्यवाह दुष्यंत देशपांडे, विश्वनाथ जोशी, प्रशिक्षक सुनील बांगडे, तालुका क्रीडा अधिकारी निखिल बोबडे, मुख्याध्यापक संजय आंबुलकर, गणेश मुसळे, देवानंद डुकरे, दुष्यंत लांडगे तसेच वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या ज्येष्ठ खेळाडूंना दिले आहे.
ईश्वरीच्या भारतीय संघातील निवडीमुळे वरोरा शहर, चंद्रपूर जिल्हा आणि संपूर्ण विदर्भाच्या क्रीडाविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
थायलंडमध्ये भारतीय जर्सीतून ईश्वरीच्या दमदार कामगिरीकडे आता संपूर्ण वरोरासह विदर्भाचे लक्ष लागले असून, तिच्याकडून देशासाठी आणखी एका ऐतिहासिक यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


