
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.२७ जून : मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने फंक्शन सेलिब्रेशन हॉल, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे काँग्रेस पक्षाच्या BLA-2 प्रतिनिधींसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली, चामोर्शी आणि धानोरा तालुक्यातील BLA-2 प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रशिक्षक गौतम नीतनवरे यांनी मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाची उद्दिष्टे, मतदार पडताळणी प्रक्रिया, गणना पत्रक भरण्याची पद्धत, नवमतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्त्या तसेच बूथस्तरावरील कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून अचूक मतदार नोंदणी सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आगामी मतदार पुनर्निरीक्षण अभियानात बूथ प्रमुख व BLA-2 प्रतिनिधींवर मोठी जबाबदारी आहे. पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, त्रुटी दूर करणे आणि अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, नगरसेवक सतीश विधाते, रमेश चौधरी, सुमित तुरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव पंकज गुड्डेवार, माजी जि.प. सदस्य विनोद लेनगुरे, कुसुमताई अलाम, पुष्पलता कुमरे, प्रमोद भगत, प्रशांत कोराम यांच्यासह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी, बूथ प्रमुख व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

