
रस्ते बंद असताना हवाई मार्गाने रुग्णांचे स्थलांतर; पूरग्रस्तांसाठी लॉयड्स कडुन जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप
अमित कत्तीवार | विशेष प्रतिनिधी
भामरागड : भामरागड तालुक्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवून देताना प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत तीन गंभीर रुग्णांना तातडीने हवाई मार्गाने हेडरी येथे हलविण्यात आले. रस्ते मार्ग बंद आणि धोकादायक बनले असताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने रुग्णांना वेळेत पुढील उपचारासाठी पोहोचविणे शक्य झाले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णांच्या स्थलांतराचे नियोजन केले. भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरातून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलेल्या सात वर्षीय संगीता चुक्कू उसेंडी हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी तातडीने हेडरी येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
पूरामुळे रस्ते मार्गाने रुग्णाला हलविणे वेळखाऊ तसेच जोखमीचे ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे लॉयड्स मेटल्सचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यात आले. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून संगीता हिला लाहेरी येथून हेडरी येथे आणण्यात आले. त्यानंतर तिला हेडरी येथील मॉ काली अम्मल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याच आपत्कालीन मोहिमेत अपेक्षा ऋषी आलाम आणि रोशन चिना मडावी या दोन गंभीर रुग्णांनाही पुढील उपचारासाठी हेडरी येथे हलविण्यात आले. त्यापैकी एका रुग्णाला सिकलसेलचा त्रास असल्याची माहिती आहे. पूरस्थितीमुळे सामान्य वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली असताना या तिन्ही रुग्णांचे वेळेत स्थलांतर होणे वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरले.
प्रशासन आणि लॉयड्सचा समन्वय
या आपत्कालीन कारवाईत प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि लॉयड्स मेटल्सच्या यंत्रणेने समन्वयाने काम केले. आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत तसेच भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी रुग्णांच्या स्थलांतरासाठी आवश्यक नियोजन केले. रुग्णांसोबत निर्मला आलाम आणि चिना कुडयामी हेही उपस्थित होते.
पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
केवळ वैद्यकीय मदतीपुरते मर्यादित न राहता लॉयड्स मेटल्सकडून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरणही करण्यात येत आहे. पूरामुळे अनेक कुटुंबांच्या दैनंदिन गरजा प्रभावित झाल्या असून, अशा कठीण परिस्थितीत आवश्यक वस्तूंची मदत नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत लॉयड्स मेटल्सची वैद्यकीय टीमही प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत आहे. सोमनानी सर, डॉ. सलूजा सर, डॉ. गोपाल रॉय सर, डॉ. चंदर सर, केशव सर आणि राकेश सर यांचा समावेश असलेली मेडिकल टीम पूरग्रस्त भागात नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा आणि मदत उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे.
पूरस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन लॉयड्स मेटल्सचे भोलूभाऊ (बलराज) सोमनानी हे स्वतः भामरागड परिसरात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र कार्यरत असल्याची माहिती आहे. नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रत्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
तसेच लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक (MD) श्री. प्रभाकरण सर हेही भामरागडमधील पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नागरिकांना आवश्यक वैद्यकीय मदत, जीवनावश्यक वस्तू आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीच्या यंत्रणेशी समन्वय साधत असल्याचे सांगण्यात आले.
संकटाच्या काळात सामाजिक सहभाग
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात पावसाळ्यात आरोग्यसेवा आणि वाहतुकीसमोर अनेक अडचणी निर्माण होतात. नदी-नाल्यांना पूर आल्याने रस्ते संपर्क तुटतो आणि गंभीर रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविणे कठीण होते. अशा परिस्थितीत उपलब्ध साधनसामग्रीचा तातडीने वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
तीन गंभीर रुग्णांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुरक्षितपणे हेडरी येथे हलविण्यासोबतच पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे काम लॉयड्स मेटल्सकडून सुरू आहे. त्यामुळे पूराच्या संकटात आरोग्यसेवा, हवाई वाहतूक आणि जीवनावश्यक मदतीच्या माध्यमातून कंपनीची यंत्रणा प्रत्यक्ष मदतीसाठी मैदानात उतरल्याचे चित्र भामरागड परिसरात दिसून येत आहे

