
नितेश गट्टीवार|न्यूज जागर
गडचिरोली,दि.२७ जून: नीट (NEET) परीक्षेतील गोंधळाची धग अद्याप शमलेली नसतानाच शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या घटनेने राज्यातील शिक्षण व्यवस्था पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणावर NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणाऱ्या वारंवारच्या अन्यायासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

राहुल वैरागडे म्हणाले, “खुर्ची मिळावी म्हणून राजकारणी होऊ नका, कारण राजकारणातील खुर्ची केव्हाही जाऊ शकते. खुर्ची मिळावी म्हणून उद्योगपती होऊ नका, कारण उद्योगपतीचे होत्याचे नव्हते होण्यासाठी वेळ लागत नाही. परंतु अशी माणसे बना, ज्यांच्या मोजपट्टीने गरीब-श्रीमंत नव्हे तर माणुसकी मोजली जाते.”
ते पुढे म्हणाले, “पेपरफुटी ही केवळ परीक्षा व्यवस्थेची चूक नाही, तर ती लाखो कष्टकरी पालकांच्या आशा-आकांक्षांवर घातलेला घाव आहे. गरिबांच्या लेकरांनी रात्रंदिवस अभ्यास करूनही जर त्यांच्या वाट्याला अन्यायच येणार असेल, तर त्यांच्या भविष्यावरील हे ग्रहण कधी दूर होणार?”
TET पेपरफुटी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था उभारण्यात यावी, अशी मागणी राहुल वैरागडे यांनी केली आहे.
या घटनेमुळे राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, शासनाने या प्रकरणात तातडीने ठोस आणि प्रभावी भूमिका घ्यावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

