
चामोर्शी रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोर काळाचा घाला; बापलेकांवर काळाचा आघात, अनखोडा गावावर शोककळा

चामोर्शी,दि.१० नोव्हेंबर : तालुक्यातील आष्टी येथे चामोर्शी रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अनखोडा गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजू येलमुले व त्यांचा मुलगा संदीप राजू येलमुले हे अनखोडा येथून आष्टीकडे दुचाकीने येत होते. दरम्यान, श्याम विश्वास हे आष्टी येथून आपल्या गावाकडे जात असताना चामोर्शी रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, या अपघातात राजू येलमुले आणि श्याम विश्वास यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर संदीप राजू येलमुले हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेत जखमीला तातडीने लॉयड मेटलच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. संदीप यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, हा भीषण अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. आष्टी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
बापलेकांचा प्रवास ठरला अखेरचा!
एकाच अपघातात कुटुंबातील दोघांचा मृत्यू आणि तिसऱ्या व्यक्तीची मृत्यूशी झुंज सुरू असल्याने अनखोडा गावात हळहळ व्यक्त होत आहे. आनंदाने सुरू झालेला प्रवास क्षणात मृत्यूच्या दरीत संपल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. या दुर्दैवी घटनेने येलमुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

