
परसवाडीत फराळ व ब्लँकेटचे वाटप; गोंडी भाषेत साधला ग्रामस्थांशी संवाद, गावाच्या विकासावर केली चर्चा

नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
धानोरा,दि.१० नोव्हेंबर : अनेक दशके नक्षलवादाच्या भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यंदा शांतता, विश्वास आणि नव्या आशेचा प्रकाश घेऊन दिवाळी साजरी होत आहे. नक्षलवादाच्या सावटातून बाहेर पडत असलेल्या गडचिरोलीच्या या बदलत्या वातावरणात आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी परसवाडी (ता. धानोरा) येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करून सामाजिक आपुलकीचा संदेश दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नक्षलमुक्तीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या आनंदोत्सवाच्या निमित्ताने परसवाडीचे सुपुत्र वीर शहीद सोमाजी दुग्गा यांच्यासह नक्षलवादाविरुद्धच्या लढ्यात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व शहीद जवानांच्या स्मृतींना आमदार डॉ. नरोटे यांनी विनम्र अभिवादन केले. सन २००५ मध्ये जप्पी येथे शहीद झालेल्या वीर सोमाजी दुग्गा यांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
परसवाडी येथे ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी करताना आमदार डॉ. नरोटे यांनी आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ आणि ब्लँकेटचे वाटप केले. विशेष म्हणजे, त्यांनी ग्रामस्थांशी गोंडी भाषेत संवाद साधत त्यांची विचारपूस केली. गावातील मूलभूत सुविधा, विकासकामे आणि स्थानिक समस्यांबाबत ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली.
यावेळी हरीशचंद्र मडावी यांच्या घरी आमदार डॉ. नरोटे यांनी भोजन केले. मडावी कुटुंबीयांनी केलेला प्रेमळ पाहुणचार आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आपुलकी यामुळे दिवाळीचा हा सोहळा अधिकच भावनिक आणि संस्मरणीय ठरला.
नक्षलमुक्त गडचिरोलीच्या नव्या पर्वात विकास, विश्वास आणि माणुसकीची नाती अधिक दृढ व्हावीत, हाच या दिवाळी भेटीमागील उद्देश असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
याप्रसंगी भाजयुमो जिल्हा प्रभारी सारंग साळवे, भाजपा तालुका महामंत्री सुभाष धाईत, नगरपंचायत धानोरा गटनेते तथा नगरसेवक संजय कुंडू, भाजपा तालुका कोषाध्यक्ष सुभाष खोबरे, युवा नेते अविनाश पोरेटी, लोकेशजी मशाखेत्री, नंदू शेंदरे आणि भाजयुमो तालुकाध्यक्ष सौरभ सहारे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

